अमरावती : अग्निकांडावरून प्रशासनावर गंभीर आरोप; व्हेंटिलेटर खरेदीवरही प्रश्नचिन्ह
अमरावती, २६ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण अग्निकांडात तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील द
चायनामेड व्हेंटिलेटर अन् टक्केवारीच्या हव्यासाने तीन चिमुकल्यांचा जीव?


अमरावती, २६ ऑगस्ट (हिं.स.) :

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण अग्निकांडात तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित होती की केवळ कागदोपत्रीच होती, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. रुग्णालयातील स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टरवर प्लास्टिकचे कव्हर बसवलेले होते आणि ते काढण्यात आले नव्हते. त्यामुळे आग लागल्यानंतर स्मोक डिटेक्टरचा अलार्म वाजला नाही तसेच स्प्रिंकलरमधून पाण्याचा फवारा झाला नाही, असा आरोप त्यांनी केला.

तीन नवजात बालकांचा मृत्यू होण्याइतकी गंभीर घटना घडूनही प्रशासनाची जबाबदारी निश्चित होत नसेल, तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल देशमुख यांनी केला.

व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

देशमुख यांनी रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ‘सिनलर’ कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले. संबंधित व्हेंटिलेटर ड्युप्लिकेट आणि ‘चायनामेड’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या यंत्रांच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर टक्केवारीचा व्यवहार झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर संबंधित व्हेंटिलेटरची खरेदी कोणी केली, त्यांची तांत्रिक तपासणी कोणी केली, प्रमाणपत्रे कोणत्या आधारावर देण्यात आली आणि देखभालीची जबाबदारी कोणाची होती, याचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली.

“सध्याचे प्रशासन कोणाच्याही धाकात राहिलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे?” असा सवाल करत देशमुख यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.

दरम्यान, तीन नवजात बालकांच्या मृत्यूमागे नेमकी कोणती यंत्रणा, अधिकारी किंवा तांत्रिक त्रुटी कारणीभूत ठरली, याचा तपास सुरू आहे. देशमुख यांनी केलेले व्हेंटिलेटर बनावट असल्याचे तसेच खरेदीत टक्केवारी झाल्याचे आरोप अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर येणार का, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande