
प्रशासकीय कामकाजाला गती आणि कायदा-सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार
नांदेड, २६ ऑगस्ट (हिं.स.) : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. नूतन इमारतीमुळे पोलिसांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास तसेच परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मदत होईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान आमदार चिखलीकर यांनी नूतन इमारतीतील विविध सुविधांची माहिती घेतली. पोलिसांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्यास प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर आमदार चिखलीकर यांनी बाळू पाटील कऱ्हाळे यांच्या निवासस्थानी सस्नेह भेट दिली. यावेळी कऱ्हाळे व त्यांच्या परिवाराने आमदार चिखलीकर तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी बांधवांचा आदरपूर्वक सन्मान केला.
या प्रसंगी लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, बालाजीराव खिल्लारे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पवार, भास्कर पवार, दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण, तुकाराम दाढेल, गणेश बगाडे, सतीश निखाते, अविनाश पाटील सूर्यवंशी, बाळू पाटील पवार यांच्यासह इतर मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis