सरसंघचालकांचे अमेरिकेत भारतीय पद्धतीने झाले स्वागत
अमेरिकेसह कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार न्यूयॉर्क, 26 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून मंगळवारी ते अमेरिकेत दाखल झालेत. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स
सरसंघचालकांचे न्यूयॉर्कमध्ये स्वागत करताना भारतीय


अमेरिकेसह कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार

न्यूयॉर्क, 26 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून मंगळवारी ते अमेरिकेत दाखल झालेत. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाचा हा दौरा असून, अमेरिकेनंतर ते कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार आहेत.

मोहन भागवत 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आयोजकांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला सुमारे 5 हजार भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, या कार्यक्रमावरून अमेरिकेत राजकीय विरोध आणि निदर्शने सुरू झाली आहेत. सरसंघचालकांच्या अमेरिका दौऱ्यामुळे न्यूयॉर्कचे महापौर जोह्रान ममदानी यांचा तीळपापड झाला आहे. ममदानी यांनी सरसंघचालकांच्या कार्यक्रमाबाबत आक्षेप व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांना मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये प्रस्तावित कार्यक्रम रद्द केला पाहिजे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण या रॅलीचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. मात्र, एखादा खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या विरोधात ‘हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ यांसह भारत आणि हिंदू संस्कृतीच्या विरोधातील संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलच्या बाहेर निदर्शने केली. या संघटनांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाकडे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.

आयोजकांकडून ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश

सरसंघचालकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ‘अहेड फोरम’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमाचा उद्देश संपूर्ण जगाला एकत्र आणणे हा आहे. आयोजकांच्या मते, कार्यक्रमाचा मुख्य संदेश ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा आहे.

कृत्रिम विभाजन आणि मतभेदांपलीकडे जाऊन परस्पर सन्मान, सौहार्द आणि एकतेची भावना स्वीकारण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचा हा परदेश दौरा व्यापक जागतिक संपर्क अभियानाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दौऱ्याचे तीन प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:-

भारत, हिंदू समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जगभरात असलेल्या गैरसमज आणि कथित अपप्रचाराच्या पार्श्वभूमीवर तथ्याधारित व सकारात्मक दृष्टिकोन मांडणे.

भारताच्या ऋषी-मुनींच्या परंपरेतून आलेला ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि वैश्विक एकात्मतेचा संदेश विविध देशांतील समाजांपर्यंत पोहोचवणे.परदेशात राहणाऱ्या हिंदू आणि भारतीय वंशाच्या नागरिकांच्या हितसंबंध व अधिकारांबाबत तेथील मुख्य प्रवाहातील समाजासोबत संवाद वाढवणे.या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत न्यूयॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमासोबतच टोरंटो आणि लंडन येथे सामुदायिक नेतृत्वाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघाच्या शताब्दी वर्षात जागतिक स्तरावर संपर्क आणि संवाद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande