रक्षाबंधनाच्या आठवणींमध्ये कलाकारांनी उलगडलं भावंडांचं खास नातं
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बालपणी रक्षाबंधन म्हणजे भावंडांची गडबड, घरभरलेला आनंद, भेटवस्तू, मिठाई आणि दिवसभराची धमाल. काळ पुढे सरकतो, प्रत्य
बालपणीची धमाल ते आयुष्यभराची साथ, रक्षाबंधनाच्या आठवणींमध्ये कलाकारांनी उलगडलं भावंडांचं खास नातं.


बालपणीची धमाल ते आयुष्यभराची साथ, रक्षाबंधनाच्या आठवणींमध्ये कलाकारांनी उलगडलं भावंडांचं खास नातं.


मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बालपणी रक्षाबंधन म्हणजे भावंडांची गडबड, घरभरलेला आनंद, भेटवस्तू, मिठाई आणि दिवसभराची धमाल. काळ पुढे सरकतो, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण या सणाच्या निमित्ताने बालपणीच्या त्या सुंदर आठवणी पुन्हा मनात ताज्या होतात. भावंडांसोबत घालवलेले हे क्षण, केलेली मस्ती, भांडणं आणि एकत्र साजरे केलेले सण मोठं झाल्यावर अधिकच खास वाटू लागतात. याच रक्षाबंधनाच्या आठवणी सांगत आहेत झी मराठीचे कलाकार.

‘सारेगमप’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे सांगते , “आमच्या घरी आम्ही सख्या दोन बहिणी आहोत; पण आम्हाला सख्खा भाऊ नसला तरी सख्या चुलत भावंडांची मोठी फौज आहे. जवळपास दहा फूटांच्या सोफ्यावरही न मावणारी भावंडं आमच्याकडे आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांची एक लाईन आणि ओवाळणी करणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन असायची. त्यात भेटवस्तू, मिठाई आणि भरपूर धमाल असायची. बालपणी घर भावंडांनी अक्षरशः भरलेलं असायचं. आमच्या घरात जवळपास ५०-६० जण रक्षाबंधनासाठी एकत्र यायचे. बाबांचं रक्षाबंधन आणि आईची राखी पौर्णिमा असा सगळा आनंदी गोंधळ सुरू असायचा. दिवसभराच्या गोंधळानंतर जेवण झालं की आम्ही सगळी भावंडं एका खोलीत जाऊन दोन-तीन तास झोपायचो. आमच्या त्या झोपलेल्या अवस्थेतील काही मजेशीर फोटो आणि रील्स आजही पाहिल्या की आम्हाला हसू आवरत नाही. मोठं झाल्यावर मात्र प्रत्येक नात्याला एक वेगळा आयाम मिळतो. आज आमचं नातं खूप प्रगल्भ झालं आहे. एकमेकांना न सांगताही अनेक गोष्टी समजतात, गरज पडली की आधार दिला जातो आणि भावना पटकन ओळखल्या जातात. भावंडांचं हे नातं आता आणखी घट्ट झालं आहे, याचा मला खूप आनंद आहे.”

‘तुला जपणार आहे’ मालिकेतील नर्मदा रामपुरे म्हणजेच पौर्णिमा तळवलकर यांच्या रक्षाबंधनाच्या आठवणीही तितक्याच खास आहेत. त्या सांगतात, “बालपणी रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही सगळी चुलत भावंडं एकत्र यायचो. मी कथ्थक शिकत होते आणि माझी बहीण पल्लवी वैद्य हिलाही नृत्याची खूप आवड होती. ती शिकली नसली तरी माधुरी दीक्षितची गाणी आणि नृत्य पाहून स्वतःच नृत्य शिकली. आम्ही रक्षा बंधनाच्या दिवशी एखाद्या गाण्यावर नृत्य बसवून घरच्यांसमोर सादर करायचो. हे आम्ही दरवर्षी करायचो आणि खूप एन्जॉय करायचो. माझ्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस होता. तिथे आम्ही कटिंग पेपरमध्ये खेळायचो, नाचायचो आणि लपाछपीही खेळायचो. सुट्टीचा दिवस कसा संपायचा, हे आम्हाला कळायचंच नाही. माझे काही चुलत भाऊ तळेगावला राहायचे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या वेळी आम्ही त्यांना पोस्टाने राखी पाठवायचो आणि त्यांच्याकडून पत्र यायचं. त्या काळात व्हिडिओ कॉलची सुविधा नव्हती, त्यामुळे पत्राचीही एक वेगळीच मजा होती. लहानपणी भावंडांमध्ये मस्ती, मारामारी आणि भांडणं होतात. पण मोठं झाल्यावर आमच्यात खूप बदल झाला. आज आम्ही तिघंही एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो. कुठल्याही अडचणीच्या वेळी मदतीचा हात देतो. ‘आपली हक्काची दोन माणसं आहेत’ ही भावना खूप समाधान देणारी आहे. रक्षाबंधनाचं हे नातं आम्ही शेवटपर्यंत असंच जपणार आहोत.”

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील शारदा साकारणारी एकता लब्दे मात्र एकुलती एक असल्यामुळे आपल्या चुलत भावंडांसोबत रक्षाबंधन साजरं करते. त्या सांगतात, “मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला माझी चुलत भावंडं भेटतात. मात्र शूटिंग असेल तर कधी कधी भेटणं शक्य होत नाही. पण दरवर्षी न चुकता रक्षाबंधनाच्या दिवशी मी आधी देवाला राखी बांधते आणि त्यानंतर माझी आई मला राखी बांधते. मग मी तिला आवडणारी भेटवस्तू देते. एकतासाठी आईने बांधलेली ही पहिली राखी एका सुंदर विचाराचं प्रतीक आहे. माझ्या आईने माझ्या हातावर बांधलेली पहिली राखी मला शिकवते की रक्षण करणं ही फक्त पुरुषांची किंवा भावाची जबाबदारी नाही. माझी मुलगी हीच माझ्या घराची ढाल आहे, तीच आमचा आधार आहे आणि गरजेच्या वेळी तीच आमचं कवच बनू शकते. या राखीतून मला समानता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव मिळते. भविष्यात माझ्या आई-वडिलांचा खंबीर आधार बनायचं आहे, ही भावना या राखीमुळे अधिक दृढ होते. घरात सगळ्यात पहिली राखी मला मिळणं हा माझ्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा मोठा सन्मान आहे.”

रक्षाबंधनाच्या या आठवणी सांगतात की काळ बदलतो, माणसं मोठी होतात आणि जबाबदाऱ्या वाढतात, पण भावंडांचं नातं मनातलं बालपण कायम जपून ठेवतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande