
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.) मुख्यमंत्री कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प २.० अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमधील २३ गावांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी दिले.
प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी (ता. २६) चिखलदरा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात शहापूर, सलोना, भुलोरी, खडीमल, मोथा, गौलखेडा बाजार व खटकाली या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २३ गावांमध्ये प्रकल्पाच्या सहा उद्दिष्टांच्या अनुषंगाने झालेल्या कामांचा आणि प्रलंबित गरजांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत शहापूर येथे सायंकाळी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी शुभम वरखडे व गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या बेसलाईन सर्वेक्षणाची माहिती, त्यातून निश्चित झालेल्या गावनिहाय गरजा आणि त्यानुसार पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण केले.
यामध्ये अंगणवाडी दुरुस्ती, शाळांना संरक्षण भिंती, मोथा येथील शाळेतील स्वच्छतागृह, आलाडोह, लवादा, शहापूर येथील शाळांमध्ये सौरऊर्जा सुविधा व रंगरंगोटी, तसेच झिंगापूर आणि खडीमल येथे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांचा आढावा घेण्यात आला. मेळघाटातील २३ गावांचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता शिक्षण, आरोग्य, कागदपत्रांची उपलब्धता, पाणी, वीज, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता यासर्व अंगांनी करण्यासाठी आयव्हीडीपी २.० हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. -सत्यम गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी