
अमरावती, २७ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) भीषण अग्निकांडानंतर रुग्णालयांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी डफरीन आणि इर्विन रुग्णालय परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळासमोर परिसरातील पाणी तुंबण्याची गंभीर समस्या समोर आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (इर्विन) मागून जाणाऱ्या मुख्य नाल्याची सफाई आणि खोलीकरण झाले नसल्याने परिसरात सातत्याने पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांना फोन करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी लोकप्रतिनिधींना माहिती देताना सांगितले की, रेल्वे स्टेशनच्या मागे सुरू असलेल्या बांधकामामुळे इर्विन रुग्णालयाच्या मागील मुख्य नाला तुंबला आहे. परिणामी मालवीय चौक, वालकट कंपाऊंड आणि डफरीन रुग्णालय परिसरात थोड्याशा पावसानेही मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
ही माहिती मिळताच राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांना फोन केला आणि संभाषण स्पीकरवर ठेवले. मात्र, आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार प्रवीण पोटे पाटील संतप्त झाले.
“रुग्णालय प्रशासन वारंवार पत्रव्यवहार करत असताना तुम्ही काय खुर्चीवर बसून गोट्या खेळत आहात का? पोकलेन घेऊन या आणि नाला रिकामा करा! कोण आडवं येतंय तेच आम्ही बघतो, अशा शब्दांत त्यांनी मनपा प्रशासनाला सुनावले.
मनपा अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता नाला तातडीने मोकळा करून पाणी तुंबण्याची समस्या निकाली काढावी, असा स्पष्ट इशाराही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिला.
या भाजप शिष्टमंडळात राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी