
दुबई, २७ ऑगस्ट (हिं.स.) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रतिबंधित पदार्थासाठी पॉझिटिव्ह चाचणी आल्यामुळे युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी घातली आहे. आसिफने ही बंदी स्वीकारली आहे. त्याच्या नमुन्यात मेस्टेरोलोन या प्रतिबंधित पदार्थाचा मेटाबोलाइट आढळला होता. आसिफची बंदी ८ सप्टेंबर, २०२५ पासून, म्हणजेच त्याच्या स्पर्धेबाहेरील डोपिंग चाचणीच्या तारखेपासून, लागू होईल. ही बंदी ७ डिसेंबर, २०२६ पर्यंत असणार आहे.
२०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून आसिफने युएईसाठी ३८ एकदिवसीय आणि ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आयसीसीच्या डोपिंग विरोधी संहितेच्या कलम २.१ चे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे.
आसिफने जागतिक डोपिंग विरोधी संस्था (WADA) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यासोबत झालेल्या 'केस रिझोल्यूशन करारा'अंतर्गत प्रस्तावित शिक्षा स्वीकारली, ज्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाहीशी झाली.
आयसीसी अँटी-डोपिंग कोडनुसार, ८ सप्टेंबर २०२५ पासून ते २९ डिसेंबर २०२५ रोजी त्याच्या तात्पुरत्या निलंबनाची सुरुवात होईपर्यंतचे त्याचे वैयक्तिक निकाल देखील अवैध ठरवण्यात आले आहेत. त्याची पदके, गुण, बक्षीस रक्कम आणि इतर पुरस्कारही काढून घेतले जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे