

नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण महिला मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या प्रेरणा समशेर वरपुडकर यांच्या उपस्थिती मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून सुरू होणारे ‘सेवा संकल्प अभियान’, तसेच इतर कार्यक्रमाबाबत संवाद व चर्चा करण्यात आली.
यावेळी महिला मोर्चाच्या आगामी संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन करून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्तीने सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीस नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण जिल्ह्यातील सर्व महिला मोर्चा मंडळ अध्यक्षांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. संघटन अधिक बळकट करण्याचा आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महिला मोर्चाचे कार्य पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रुती तुडमे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिता चौंडीकर, मीरा सांगनोर यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis