
नाशिक, 27 ऑगस्ट (हिं.स.)। भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन जणांच्या बोलेरो पिकअप गाड्या परत न करता दोन जणांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत बंटी जनार्दन लोंढे (रा. घरकुल योजना, चुंचाळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १७ जून रोजी आरोपी अजय पाटोळे व शेख निजामोद्दीन शेख सईद यांनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीशी गाडी भाडे करारनामा करून फिर्यादीच्या मालकीची एमएच १५ जेडब्ल्यू १८४१ या क्रमांकाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी मासिक ३७ हजार रुपये भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली, तसेच फिर्यादीसह समाधान टोंगारे यांची एमएच १२ पीक्यू ०२१४ या क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीसुद्धा भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली; मात्र भाडे कराराची नोटरी न करतात्यांनादेखील भाडे दिले नाही.
अशा प्रकारे फिर्यादी लोंढे व समाधान टोंगारे यांनी आरोपी अजय पाटोळे व शेख निजामोद्दीन यांच्याकडे वाहने परत मागितले असता परत न करता त्या गाड्यांचा अपहार करून फिर्यादीची एकूण १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेळके करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI