
अमरावती, २७ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, मेंदूज्वर यांसह अन्य साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी मनपा आरोग्य व स्वच्छता विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. शहरातील सर्व आरोग्य केंद्रे तसेच झोन कार्यालयांतर्गत कार्यरत स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य सेवकांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव आणि साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य व स्वच्छता विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पथकांकडून घरोघरी गृहभेटी देऊन पाण्याचे कंटेनर तपासण्यात येणार आहेत.
डासांची उत्पत्ती होणारे दूषित कंटेनर नष्ट करणे, आवश्यक ठिकाणी गप्पी मासे सोडणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच तापाचे रुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी करून दूषित पाणी आढळल्यास संबंधित ठिकाणी आवश्यक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले.
रुग्ण आढळलेल्या परिसरात फवारणी
डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य निरीक्षक व आरोग्य सेवकांच्या समन्वयाने फवारणी आणि धूरफवारणी करण्याच्या सूचना डॉ. अजय जाधव यांनी स्वच्छता अधिकारी व निरीक्षकांना दिल्या. संबंधित परिसरात विशेष पथके पाठवून रुग्ण शोधमोहीम राबवावी आणि आवश्यक ती कारवाई करावी. या कामात कोणतीही हयगय करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश
साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांनी सर्व आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक आणि स्वच्छता निरीक्षकांना केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. साथीचे आजार कशा प्रकारे उद्भवतात आणि त्यांचा प्रसार कसा रोखता येईल, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, कोणत्याही ठिकाणी अडचण निर्माण झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून समस्या सोडवावी, अशा सूचना देण्यात आल्या.
नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, पाणी साचू देऊ नये आणि डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.
साथीचे आजार रोखण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त वैशाली बोरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे आणि स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव यांनी संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले असून, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी