
लातूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। हंडरगुळी येथील शेतकऱ्याला व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ, धमकी देऊन मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास शिवाजी बोळेगावे (वय ४५, रा. हंडरगुळी, ता. उदगीर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजण्यापूर्वी हंडरगुळी शिवारातील मोरतळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात घडली. रामदास बोळेगावे हे शेतीसोबत पिग्मी एजंट म्हणूनही काम करीत होते.
याप्रकरणी मृत रामदास बोळेगावे यांचे भाऊ विलास शिवाजी बोळेगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रम ऊर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने (जीवन माने यांचे वडील), तिघेही रा. हाळी, ता. उदगीर, यांनी संगनमत करून रामदास यांना व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ व धमकी दिली. तसेच मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा पूर्वइतिहास नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis