नेरळ पोलीस ठाण्यात तब्बल दोन महिन्यांपासून महिला अधिकारी पद रिक्त!
रायगड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. यापूर्वी प्राची पांगे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी म्हणून उत्तमरीत्या कर्तव्य बजावताना महिलांशी संबंधित तक्रारी आणि संवेद
Post of female officer at Neral Police Station vacant since June 29!


रायगड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. यापूर्वी प्राची पांगे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी म्हणून उत्तमरीत्या कर्तव्य बजावताना महिलांशी संबंधित तक्रारी आणि संवेदनशील प्रकरणे प्रभावीपणे हाताळली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले असून अद्याप नवीन महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून ग्रामीण भागाचाही समावेश आहे. महिला अत्याचार, कौटुंबिक वाद, छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांशी संबंधित विविध तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये महिला तक्रारदारांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी, यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते.

प्राची पांगे यांच्या कार्यकाळात महिला तक्रारदारांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेसाठी मदत मिळत होती. त्यांच्या बदलीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून महिला अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने या पदावर तातडीने नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विशेषतः कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ, विनयभंग, छेडछाड तसेच अल्पवयीन मुलींशी संबंधित प्रकरणांमध्ये महिला अधिकाऱ्याची उपस्थिती तक्रारदारांसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण करणारी ठरते. त्यामुळे हे पद दीर्घकाळ रिक्त राहणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नेरळ परिसरातील वाढती लोकसंख्या आणि महिलांशी संबंधित तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या रिक्त पदाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. प्राची पांगे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेले हे पद दोन महिन्यांनंतरही भरलेले नसल्याने नवीन महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महिला सुरक्षेला प्राधान्य देताना नेरळ पोलीस ठाण्यातील रिक्त महिला पोलीस अधिकारी पद तातडीने भरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande