
अमरावती, २७ ऑगस्ट (हिं.स.) : ईद-ए-मिलाद, कावड यात्रा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आदेश लागू राहणार आहे.
धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चिन्हांकित किंवा आक्षेपार्ह गाणी, तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि भडकाऊ भाषणांच्या क्लिप्स वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून सार्वजनिक शांतता भंग होईल, अशा प्रकारचे साहित्य किंवा ध्वनिमुद्रण वापरू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.सण-उत्सवांच्या काळात विविध सोशल मीडिया माध्यमांवरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणाऱ्या किंवा समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, संदेश किंवा इतर मजकूर प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.सण-उत्सव शांततेत पार पडावेत आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी