
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। होट्टल ता. देगलूर येथे झेंडूच्या 'अर्क भानू' वाणाच्या मूल्यमापनासाठी शेतावरील चाचणी अंतर्गत लागवडीपूर्व प्रशिक्षण आणि निविष्ठा रोप वाटपाचा कार्यक्रम पार पडला. उद्यानविद्या विषय विशेषज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना झेंडू लागवडीच्या सुधारित उत्पादन पद्धतींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या सत्रात प्रामुख्याने जमीन तयार करणे, खतांचा वापर, लागवडीचे तंत्र, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणीची वेळ (योग्य परिपक्वता) आणि विपणन (मार्केटिंग) धोरणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यात आली. भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था (IIHR), बेंगळुरू यांनी विकसित केलेल्या 'अर्क भानू' या अधिक उत्पादन देणाऱ्या झेंडूच्या वाणाची वैशिष्ट्येही त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितली. उपक्रमांतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मूल्यांकनासाठी 'अर्क भानू'च्या रोपांचे वाटप करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis