
पुणे, 27 ऑगस्ट (हिं.स.)। वातावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रादुर्भावही वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच श्वसनासंबंधी विविध लक्षणे दिसून येऊ शकतात.
महापालिकेच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात इन्फ्लुएंझा H1N1 चे १९ बाधित रुग्ण आढळले आहेत. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळाल्याने या कालावधीत एकही जीवितहानी झालेली नाही.
नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत अनावश्यक भीती न बाळगता वेळेत जवळच्या महापालिका दवाखान्यात किंवा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान आणि उपचार केल्यास आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु