
आरोपीवर कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार
पुणे, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
या घटनेच्या तपासाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून माहिती घेतली. तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रकरणाचा तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु