
आंबेडकर स्वाभीमानी सेनेच्या दबावात झाली कारवाई
यादगीर,28 ऑगस्ट (हिं.स.) : कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी झाल्याचा आरोप करत 2 सरकारी शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटक शिक्षण विभागाने ही कारवाई कर्नाटक नागरी सेवा (आचरण) नियम, 2021 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून केली आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही शिक्षक निलंबित राहणार आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये हुनसगी येथील सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक गुरुराज जोशी आणि सुरपूर तालुक्यातील कुप्पी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अन्ना साहेब देशमुख यांचा समावेश आहे. विभागाच्या माहितीनुसार, दोन्ही शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या पथसंचलनात सहभागी झाल्याचा आरोप आहे. या कृतीला शासकीय सेवकांसाठी लागू असलेल्या आचार नियमांचे उल्लंघन तसेच कर्तव्यातील निष्काळजीपणा मानण्यात आला आहे.
विभागीय कारवाईनुसार, सहाय्यक शिक्षक गुरुराज जोशी यांनी 12 ऑक्टोबर 2025 रोजी विजयपूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथे आयोजित संघाच्या पथसंचलनात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमातील त्यांचा सहभाग दर्शवणारे छायाचित्र एका कन्नड दैनिकात प्रसिद्ध झाले होते. यानंतर अंबेडकर स्वाभिमानी सेनेच्या जिल्हाध्यक्ष जुमाना गुडीमणि यांनी याबाबत आक्षेप घेत जोशी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. त्यावर शिक्षण विभागाने 13 मार्च 2026 रोजी जोशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आपल्या लेखी उत्तरात जोशी यांनी हा कार्यक्रम रविवारी, शाळेच्या वेळेनंतर आयोजित करण्यात आला होता आणि तो राजकीय कार्यक्रम नसून सांस्कृतिक कार्यक्रम होता, असा दावा केला.मात्र, शिक्षण विभागाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही. विभागीय चौकशी प्रलंबित असताना कर्नाटक नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, 1957 मधील नियम 10 (1) अंतर्गत त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.
अण्णा साहेब देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई
दुसऱ्या प्रकरणात, कुप्पी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अन्ना साहेब देशमुख यांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी हुनसगी येथे आयोजित संघाच्या पथसंचलनात सहभागी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणीही अंबेडकर स्वाभिमानी सेनेच्या जिल्हाध्यक्ष जुमाना गुडीमणि यांनी ग्रामीण विकास, पंचायत राज आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तसेच कलबुर्गी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री प्रियांक खरगे यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.तक्रारीनंतर शिक्षण विभागाने देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आपल्या स्पष्टीकरणात देशमुख यांनीही हा कार्यक्रम शाळेच्या कामकाजाच्या वेळेत झाला नसल्याचे सांगितले. तसेच संघाचा कार्यक्रम राजकीय नसून सांस्कृतिक स्वरूपाचा असल्याचा दावा त्यांनी केला.मात्र, शिक्षण विभागाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश जारी केला.दोन्ही शिक्षकांवरील विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी