
वर्धा, 28 ऑगस्ट (हिं.स.) : आपल्या बेधडक आणि विनोदी भाषणशैलीमुळे संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना वर्धा शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यानंतर दिनांक २७ ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी आता थेट कारागृहात करण्यात आली आहे.
कराळे मास्तर यांनी कुंभमेळा आणि साधूंबाबत एक कथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत 'विश्व हिंदू परिषदे'ने (विहिंप) पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वर्धा शहर पोलिसांनी कराळे मास्तर यांच्यावर संबंधित कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याच तपासाचा भाग म्हणून गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ही धडक कारवाई केली.न्यायालयाने कराळे मास्तर यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने या कारवाईचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावरून आगामी काळात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची दाट शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी