

आसाम आणि मिझोरममधील दोन कारवायांत दोघांना अटक
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट (हिं.स.) : ईशान्येकडील सीमेवर अमली पदार्थ तस्करांविरोधातील कारवाई तीव्र करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आसाम आणि मिझोरममध्ये गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ७६ किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
आसाममध्ये ट्रकमधून ५६ किलो अमली पदार्थ जप्त
गेल्या २५ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आसाम रायफल्सच्या सिलचर येथील ३८व्या बटालियनच्या जवानांच्या मदतीने आसाम-मणिपूर सीमेजवळील लालपानी येथे एका संशयित १२-चाकी ट्रकला अडवले. हा ट्रक मणिपूरमधील जिरीबामहून येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या ताफ्यावर बारकाईने नजर ठेवून संशयाच्या आधारे निवडण्यात आला होता.
ट्रकची सखोल तपासणी केली असता चालकाच्या आसनाच्या मागे खास तयार करण्यात आलेला गुप्त कप्पा आढळून आला. या कप्प्यात गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्या असलेली १ किलो वजनाची ३६ पाकिटे आणि २०० ग्रॅम वजनाची १०० छोटी पाकिटे सापडली.
फील्ड डिटेक्शन किटच्या साहाय्याने नमुन्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये अँफेटामाइन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ५६ किलो अमली पदार्थ आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आला. या कारवाईत संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली.
मिझोरममध्ये कारच्या गुप्त कप्प्यांतून २० किलो जप्त
यापूर्वी १८ ऑगस्ट २०२६ रोजी मिझोरममधील ऐझॉल-चंफई मार्गावर डीआरआयने आणखी एक मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे ऐझॉलपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बंग बांगला येथे एका कारला अडवण्यात आले.
कारची झडती घेतली असता दोन्ही बाजूंच्या रॉकर पॅनेल्स/साइड सिल्समधील खोल कप्प्यांमध्ये तसेच इंधनाची टाकी आणि कारच्या फरशीमधील मोकळ्या जागेत लपवून ठेवलेली गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्यांची २० किलो वजनाची ६४ पाकिटे आढळून आली.
एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे केलेल्या प्राथमिक चाचणीत या पदार्थात अँफेटामाइन असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात हा अमली पदार्थ म्यानमारमधून जोखाव्थर-चंफई मार्गे मिझोरममध्ये तस्करी करून आणण्यात आल्याचे समोर आले आहे.
२० किलो अमली पदार्थ आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आली असून वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.
मेथाम्फेटामाइनचे गंभीर दुष्परिणाम
मेथाम्फेटामाइन हे मेंदूवर तीव्र परिणाम करणारे आणि व्यसनाधीनतेची उच्च शक्यता असलेले शक्तिशाली कृत्रिम उत्तेजक अमली पदार्थ आहे. त्याच्या गैरवापरामुळे हृदयविकार, अस्वस्थता, अतिसंशय आणि मानसिक संतुलन बिघडणे यांसारखे गंभीर शारीरिक व मानसिक परिणाम होऊ शकतात. दीर्घकाळ सेवन केल्यास तीव्र व्यसनासह मज्जासंस्था आणि वर्तनाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
मेथाम्फेटामाइनचा समावेश एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणून करण्यात आला आहे. त्याचे बेकायदेशीर उत्पादन, ताबा, वाहतूक आणि तस्करी केल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule