डॉ. सुनिता तोंडगे यांनी गृहलक्ष्मी मिसेस इंडिया स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। नवी दिल्ली येथे नुकत्याच दिमाखात पार पडलेल्या ''गृहलक्ष्मी मिसेस इंडिया २०२६'' या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत अंबाजोगाईच्या डॉ. सुनिता गणेश तोंडगे (सोळंके) यांनी ''सेकंड रनर अप'' हा मानाचा किताब पटकावून मराठवाड्याच्या श
डॉ सुनिता तोंडगे


बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। नवी दिल्ली येथे नुकत्याच दिमाखात पार पडलेल्या 'गृहलक्ष्मी मिसेस इंडिया २०२६' या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत अंबाजोगाईच्या डॉ. सुनिता गणेश तोंडगे (सोळंके) यांनी 'सेकंड रनर अप' हा मानाचा किताब पटकावून मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. केवळ बाह्य सौंदर्य नव्हे, तर बुद्धिमत्ता, सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याची ताकद म्हणजेच खरी 'गृहलक्ष्मी', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

विजेतेपदाचा भावनिक क्षण

विजेतेपदाची घोषणा झाली, तो क्षण डॉ. सुनिता यांच्यासाठी अत्यंत भावनिक आणि डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा होता. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि ज्येष्ठ कलाकारांच्या ज्युरी पॅनेलकडून मिळालेली ही दाद त्यांच्या कष्टाचे चीज करणारी ठरली. एक व्यावसायिक डॉक्टर, गृहिणी आणि आई म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकूट परिधान करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कम्फर्ट झोनच्या पलीकडचा प्रवास

अंबाजोगाई येथे स्वतःचे हॉस्पिटल (आई नर्सिंग होम) चालवणाऱ्या डॉ. सुनिता एमबीबीएस, डिप्लोमा इन ॲनेस्थेशिया आणि सोनोलॉजिस्ट आहेत. दररोजचे वैद्यकीय काम, रुग्णांची सेवा आणि घर यामध्ये त्या व्यस्त असायच्या; मात्र स्वतःला नेहमी 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर ठेवून काहीतरी नवे शिकण्याची त्यांची जिद्द होती. गेल्या वर्षी त्यांनी 'मिसेस महाराष्ट्र' स्पर्धेत यश मिळवले होते. त्यानंतर 'दिवा' टीमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'मिसेस इंडिया २०२६' स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत देशभरातून आलेल्या ४० स्पर्धकांमध्ये विविध आजारांवर मात करून आलेल्या महिलांचाही समावेश होता. अशा आव्हानात्मक आणि सकारात्मक वातावरणात डॉ. सुनिता यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर वेगळी छाप पाडली.

कठोर दिनचर्या आणि वेळेचे नियोजन

संसार, मुलांचा अभ्यास आणि रुग्णालयातील व्यस्त कामातून सौंदर्य स्पर्धेसाठी वेळ काढणे सोपे नव्हते. मात्र, योग्य नियोजन आणि शिस्तीच्या बळावर त्यांनी अवघ्या १५-२० दिवसांच्या तयारीत हे यश मिळवले. सकाळी साडेचार वाजता उठून योगा, ध्यानधारणा, रॅम्प वॉकचा सराव आणि वाचन अशी त्यांची दिनचर्या असायची. आधुनिकतेसोबतच भारतीय संस्कृतीचा टच जपत त्यांनी साडी आणि पारंपरिक वेशभूषेच्या फेऱ्यांमध्ये उत्तम सादरीकरण केले.

दडपणावर प्रयत्नपूर्वक केली मात

स्पर्धेदरम्यान उच्च टाचांच्या सँडल्स (हिल्स) वापरून होणारा रॅम्प वॉक, वेगवेगळ्या राज्यांतील स्पर्धकांमधील भाषेचे अंतर आणि तीव्र स्पर्धा यामुळे दडपण येणे स्वाभाविक होते. एकदा तर सरावादरम्यान अचानक सँडल तुटल्याचा प्रसंगही घडला; पण शांत राहून संकटावर मात करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी तो अडथळा सहज पार केला. वैद्यकीय क्षेत्रात क्रिटिकल रुग्णांना हाताळताना लागणारा संयम त्यांना या मंचावरही उपयोगी पडला.

'अंतर्गत तेज आणि व्यक्तिमत्त्व' हीच सौंदर्याची खरी व्याख्या

डॉ. सुनिता यांच्या मते, सौंदर्याची व्याख्या केवळ बाह्य रूपापुरती किंवा सोशल मीडियावरील दिखाव्यापुरती मर्यादित नाही. संवाद कौशल्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी, नेतृत्वगुण, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास म्हणजेच खरे सौंदर्य होय. ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांच्यातील संकोच दूर झाला असून सोशल मीडिया आणि सार्वजनिक मंचावर त्या अधिक आत्मविश्वासाने महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करत आहेत.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

कोणत्याही महिलेच्या यशामागे तिच्या कुटुंबाची साथ अत्यंत मोलाची असते. डॉ. सुनिता यांच्या या प्रवासात त्यांचे पती डॉ. गणेश तोंडगे, त्यांच्या सासूबाई आणि घरातील मदतनीस यांचा मोलाचा वाटा राहिला. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊनही कुटुंबाने दिलेला मानसिक आधार आणि विश्वास यामुळेच त्या या राष्ट्रीय मंचावर आत्मविश्वासाने उभ्या राहू शकल्या.

स्त्री शक्तीला मोलाचा संदेश

आजच्या महिलांनी संसाराच्या आणि कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची स्वप्ने कधीही सोडू नयेत, असा संदेश डॉ. सुनिता देतात. कोणत्याही वयात, सकारात्मक दृष्टिकोन, आरोग्याची काळजी आणि स्वतःवरचा विश्वास ढळू न देता महिला मल्टिटास्किंग बनून कोणतेही ध्येय गाठू शकतात.

आगामी काळात मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी समोर असली, तरी आपल्या मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय पेशा याला प्राधान्य देत, एक डॉक्टर म्हणून महिलांच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत राहणे हीच आपली खरी ओळख असल्याचे डॉ. सुनिता गणेश तोंडगे (सोळंके) अत्यंत नम्रतेने नमूद करतात. त्यांचा हा प्रवास मराठवाड्यातील आणि ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande