आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी दिग्रसमध्ये खळबळ; तरुण पोलिसांच्या ताब्यात
यवतमाळ, 28 ऑगस्ट (हिं.स.) : सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टमुळे दिग्रस शहरात खळबळ उडाली आहे. या पोस्टमुळे विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले
आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी दिग्रसमध्ये खळबळ; तरुण पोलिसांच्या ताब्यात


यवतमाळ, 28 ऑगस्ट (हिं.स.) : सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टमुळे दिग्रस शहरात खळबळ उडाली आहे. या पोस्टमुळे विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, रात्री दिग्रस शहरातील एका चौक परिसरात नागरिकांचे इंस्टाग्रामवरील एका स्टोरीकडे लक्ष गेले. या स्टोरीमध्ये एका तरुणाचा फोटो तसेच विशिष्ट धर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांबाबत आक्षेपार्ह वाटणारा मजकूर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीची दखल घेत दिग्रस पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान विशिष्ट समाजातील नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश देशमुख करीत आहेत. संबंधित इंस्टाग्राम खाते, पोस्टची सत्यता, तिचा स्रोत, प्रसाराची व्याप्ती तसेच पोस्टमागील कथित उद्देश याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, तपास पूर्ण होण्यापूर्वी या प्रकरणाबाबत अफवा अथवा अपप्रचार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा. कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास त्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याची माहिती थेट पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande