
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)।बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार व इतर अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला वेग आला असून, परिक्षेत्राधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह दोन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा एकूण १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मौजे निघरूड, ता. माजलगाव येथील शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री करून परिक्षेत्राधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.कारवाईदरम्यान काही इसम गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये रोख रक्कम, अंदाजे ९ लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने आणि १ लाख ३० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन असा एकूण १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव अशोक अनंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने केली.कारवाईमध्ये सपोनि महेश भोसले, पोलीस शिपाई अक्षय लोंढे, पोलीस शिपाई कृष्णा काकडे, पोलीस शिपाई सचिन गायकवाड, पोलीस शिपाई पांडुरंग मोटे, पोलीस शिपाई राजाभाऊ मोटे, पोलीस शिपाई कागणे तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis