
मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। कन्नड सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी काहीशी मंदावली आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये दमदार सुरुवात करत पहिल्याच दिवशी १०१.१० कोटी रुपयांची बंपर कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी ही कमाई घसरून ३७.६५ कोटी रुपयांवर आली. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) माहितीनुसार, रक्षाबंधनाची सुट्टी असूनही तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने अंदाजे २६.६० कोटी रुपयांची कमाई केली. परिणामी, पहिल्या तीन दिवसांतील एकूण कमाईचा आकडा सुमारे १६५.३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये 'टॉक्सिक'बद्दल प्रचंड उत्सुकता होती, तरीही समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र ते नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. असे असूनही, हिंदी बाजारपेठेत या चित्रपटाने आपले स्थान मजबूत राखले आहे. पहिल्या तीन दिवसांच्या कमाईच्या आधारे, 'टॉक्सिक'ने या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत आठवे स्थान पटकावले आहे. या चित्रपटाने इम्तियाज अलीचा 'मैं वापस आऊंगा' आणि शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' यांच्या एकूण (लाइफटाइम) कमाईचा टप्पा ओलांडला आहे. आता या चित्रपटाची नजर 'कॉकटेल २'च्या विक्रमाकडे आहे.
गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक'ची कथा 'राया' (यश) या गँगस्टरभोवती फिरते, ज्याचा सांभाळ त्याची बहीण 'गंगा' (नयनतारा) हिने केला आहे. रायाचे 'रेबेका' (तारा सुतारिया) हिच्यासोबत नाते असते, परंतु त्याच्या आयुष्यात सर्कस कलाकार 'नादिया' (कियारा अडवाणी) हिच्या आगमनानंतर कथानकाला एक वेगळे वळण मिळते. राया आणि नादिया यांच्या प्रेमकथेसोबतच, त्याचा मुलगा 'तिकीट' याच्याशी संबंधित घटना हा या कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटात रुक्मिणी वसंत आणि सुदेव नायर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'टॉक्सिक'ची निर्मिती यश आणि केव्हीएन (KVN) प्रॉडक्शन यांनी संयुक्तपणे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर