
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट (हिं.स.)जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याची श्रीलंका विरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे बुमराहला या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
नबीने रणजी करंडक स्पर्धेतील दोन उत्कृष्ट हंगामांच्या जोरावर वरिष्ठ संघात स्थान मिळवले आहे. त्याने एकूण १०४ बळी घेतले आहेत. यात २०२५-२६ च्या हंगामातील ६० बळींचा समावेश आहे, ज्यामध्ये त्याने जम्मू-काश्मीरला त्यांचे पहिले रणजी करंडक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नबीच्या या कामगिरीमुळे त्याला श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या 'इंडिया ए' संघातही स्थान मिळाले होते. या वेगवान गोलंदाजाने 'श्रीलंका ए' विरुद्धच्या दोन चार-दिवसीय सामन्यांमध्ये सहा बळी घेतले; यात पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात ५८ धावांत ४ बळी घेण्याच्या कामगिरीचा समावेश होता.
दुसरीकडे, गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यापासून बुमराह अजूनही संघाबाहेरच आहे. या प्रमुख वेगवान गोलंदाजाचा श्रीलंका मालिकेसाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्यासाठी त्याला बंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक होते. पण तो वेळेत पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. या नवीन अडथळ्यामुळे बुमराहचे कसोटी क्रिकेटमधील पुनरागमन आणखी लांबणीवर पडले आहे. ऑस्ट्रेलियातील २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान पाठीला दुखापत झाल्यानंतर त्याचा वर्कलोड आधीच काळजीपूर्वक हाताळला जात होता.
गेल्या वर्षी इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांपैकी तो केवळ तीन सामन्यांत खेळला होता आणि त्यानंतर जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंका मालिकेसाठीच्या भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत असून के.एल. राहुल उपकर्णधार आहे. साई सुदर्शन देखील संघाचा भाग आहे, मात्र त्याचे खेळणे फिटनेस चाचणी उत्तीर्ण होण्यावर अवलंबून असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे