
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट (हिं.स.)। विंडमिल टॉवरचे उत्पादन आणि निर्मिती करणाऱ्या अनाविल वायर अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा 177.81 कोटी रुपयांचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 5 ऑगस्टपर्यंत बोली लावता येणार आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी शेअरचे वाटप केले जाईल, तर 7 ऑगस्ट रोजी वाटप झालेले शेअर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनीचे शेअर 10 ऑगस्ट रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
आयपीओ सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या इश्यूला 4.77 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 257 रुपये ते 270 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओचा लॉट साइज 400 शेअरचा आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट म्हणजेच 800 शेअरसाठी अर्ज करावा लागणार असून त्यासाठी 2 लाख 16 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओअंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण 65 लाख 85 हजार 600 नवीन शेअर जारी करण्यात येत आहेत. यामध्ये सुमारे 35 कोटी रुपयांचे 13 लाख 800 शेअर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जात आहेत, तर सुमारे 143 कोटी रुपयांचे 52 लाख 84 हजार 800 नवीन शेअर जारी केले जात आहेत.
या इश्यूमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदार म्हणजेच क्यूआयबीसाठी 47.47 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 33.25 टक्के, तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच एनआयआयसाठी 14.25 टक्के हिस्सा राखीव आहे. याशिवाय मार्केट मेकरसाठी 5.03 टक्के हिस्सा ठेवण्यात आला आहे. या आयपीओसाठी हेम सिक्युरिटीज लिमिटेडला बुक रनिंग लीड मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे रजिस्ट्रारची जबाबदारी देण्यात आली आहे.
कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे पाहता, गेल्या काही वर्षांत अनाविल वायर अँड इंजिनिअरिंग लिमिटेडच्या उत्पन्नात आणि नफ्यात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीला 4.39 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. त्यानंतर 2024-25 मध्ये हा नफा वाढून 12.31 कोटी रुपये झाला, तर 2025-26 मध्ये कंपनीने 36.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. कंपनीच्या महसुलातही सातत्याने वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये कंपनीचा महसूल 54.08 कोटी रुपये होता, जो 2024-25 मध्ये वाढून 79.40 कोटी रुपये झाला. 2025-26 मध्ये कंपनीला 143.63 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
मात्र, या काळात कंपनीवरील कर्जाचा भारही वाढला आहे. 2023-24 मध्ये कंपनीवर 51.86 कोटी रुपयांचे कर्ज होते, जे 2024-25 मध्ये 55.11 कोटी रुपये आणि 2025-26 मध्ये वाढून 128.25 कोटी रुपये झाले. कंपनीची निव्वळ मालमत्ता म्हणजेच नेटवर्थ 2023-24 मधील 27.77 कोटी रुपयांवरून 2025-26 मध्ये 89.51 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीच्या राखीव निधी आणि अतिरिक्त शिल्लक रकमेतही वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये हा निधी 18.12 कोटी रुपये होता, जो 2025-26 मध्ये वाढून 69.80 कोटी रुपये झाला. तसेच कंपनीचा ईबीआयटीडीए 2023-24 मधील 22.22 कोटी रुपयांवरून 2025-26 मध्ये वाढून 61.09 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule