
मुंबई, 03 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायट नेशन्स’च्या (आयआयएमयूएन) पंधराव्या वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेत उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. यावेळी ते ‘जेन-झी’ आणि ‘अल्फा-झेन’ या तरुण पिढीशी विशेष संवाद साधतील.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिषदेत देशातील 100 हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील 2 हजारांहून अधिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यंदाच्या उद्घाटन सत्राची संकल्पना “The Role of Youth in Uniting the World, the Indian Way” अशी असून, जागतिक ऐक्य, नेतृत्व आणि भारताची भूमिका या विषयांवर चर्चा होणार आहे. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी सांगितले की, प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ पुढील पिढीला मार्गदर्शन करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांना समजून घेणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारत जागतिक स्तरावर आपली भूमिका अधिक बळकट करत असताना युवकांशी अर्थपूर्ण संवादाची गरज पूर्वीपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांनी डॉ. मोहन भागवत यांचे आभारही मानले.
आयआयएमयूएनची स्थापना 2011 मध्ये झाली असून ही संस्था सार्वजनिक घडामोडींशी संबंधित आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माहितीनुसार, तिचे कार्य भारतातील 275 शहरांमध्ये तसेच 40 देशांमध्ये विस्तारले असून, 7.5 कोटींहून अधिक युवकांपर्यंत तिची पोहोच आहे. परिषदेत धोरणनिर्मिती, आंतरराष्ट्रीय संबंध, नेतृत्व विकास आणि जागतिक आव्हाने यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि संवाद सत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी