
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट (हिं.स.)आसाम आणि रेल्वे संघांचे माजी क्रिकेटपटू शुभदीप घोष यांची भारतीय पुरुष संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते टी. दिलीप यांची जागा घेतील. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर दिलीप यांचा करार नूतनीकरण करण्यात आला नव्हता.
वरिष्ठ पुरुष संघासोबत घोष यांची पहिली कामगिरी ऑगस्टमध्ये श्रीलंका विरुद्ध होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका असेल. ५७ वर्षीय घोष यांनी १९९४ ते २००४ या काळात १७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि त्यांनी आसामच्या वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
दिलीप आणि रायन टेन डोशेटे यांच्या जाण्यानंतर, घोष हे गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमधील नवीन सदस्य बनले आहेत. या टीममध्ये आधीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सितांशु कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. घोष यांनी यापूर्वी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये तसेच 'इंडिया ए' आणि महिला संघासोबत काम केले आहे. याशिवाय, इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नायट रायडर्स या संघांसोबतही त्यांनी काम केले आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनने (ACA) म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत, त्यांनी विविध वयोगटांतील भारतीय संघांसोबत काम करून एक प्रभावी कोचिंग प्रोफाइल तयार केले आहे आणि आपल्या समर्पणासाठी व नैपुण्याबद्दल ओळख निर्माण केली आहे.
आसामच्याच एका क्रिकेटपटूने मिळवलेल्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल आसाम क्रिकेट असोसिएशनला अत्यंत अभिमान वाटतो. त्यांची ही नियुक्ती राज्याच्या क्रिकेट विश्वासाठी अत्यंत सन्मानाची बाब असून, या भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांसाठी ती एक प्रेरणा ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे