
अमृतसर, 03 ऑगस्ट (हिं.स.)अमृतसर येथील गांधी मैदानावर खेळल्या गेलेल्या पंजाब आंतर-जिल्हा पुरुष वरिष्ठ एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. अभिषेकने ९१ चेंडूंमध्ये २३३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या द्विशतकामुळे अमृतसरला २२० धावांनी दणदणीत विजय नोंदवता आला.
अभिषेकने आपल्या खेळीत १५ चौकार आणि २५ उत्तुंग षटकारांसह मैदानाच्या सर्व दिशांना फटकेबाजी केली. त्याचा स्ट्राईक रेट २५६.०४ होता. अभिषेकने अभय चौधरी (९३ धावा, ८५ चेंडू) सोबत पहिल्या विकेटसाठी ३०५ धावांची विक्रमी भागीदारी केली. अमृतसर संघाने आपल्या निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून ५३३ धावांचा डोंगर उभा केला. अभिनव शर्मा (५१), साहिल शर्मा (३७) आणि सुमित शर्मा (२३*) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
५३४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, तरन तारनचा संघ ५० षटकांत आठ गडी गमावून केवळ ३१३ धावाच करू शकला. तरन तारनसाठी अर्शदीप सिंगने संघर्ष करत १०८ धावा केल्या, तर मनप्रीत सिंग संधूने ६२ धावा केल्या. फलंदाजीने धुमाकूळ घातल्यानंतर, अभिषेक शर्माने आपल्या फिरकी गोलंदाजीने नऊ षटकांत ७१ धावा देऊन दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याने धोकादायक शतकवीर अर्शदीप सिंग (१०८) आणि करणवीर सिंग ढिल्लन (२६) यांना बाद केले. अमृतसरसाठी प्रथमपाल सिंग वालियाने सर्वाधिक चार बळी घेतले.
झिम्बाब्वे दौऱ्यात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे गेलेल्या अभिषेक शर्मासाठी ही खेळी जीवनदायी ठरेल. भारतासाठी ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अभिषेकने दोन शतके आणि ११ अर्धशतकांसह १६२९ धावा केल्या आहेत. ही ऐतिहासिक खेळी त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल.
झिम्बाब्वे दौऱ्यात, त्याने तीन डावांमध्ये केवळ ३.६६ च्या सरासरीने ११ धावा केल्या. इतकेच नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २६.२ च्या सरासरीने १३१ धावा केल्या, तर आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये तो केवळ ४९ धावा करू शकला. आपल्या शेवटच्या १० टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे, ज्यामुळे आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला अभिषेक तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे