नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार आवश्यक - पंतप्रधान
- देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हिं.स.) - नशेची सवय केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो. ड्रग्स विरोधात जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाधीन व्यक्तींन
पंतप्रधान मोदी


- देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हिं.स.) - नशेची सवय केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो. ड्रग्स विरोधात जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांचे कौतुक आहे. तरुणांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करण्याची गरज आहे. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांनी नव्या कल्पना, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावं. नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केवळ सरकारच नव्हे, तर प्रत्येक कुटुंब आणि समाजाने पुढाकार घेणं आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 'मन की बात'च्या 137 व्या भागातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' या अभियानाचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या मनोगतात केला. हे अभियान देशभर वेगाने पुढे जात असून, मोठ्या संख्येने तरुण त्याच्याशी जोडले जात आहेत. यासाठी तरुणांनी ड्रग्सविरोधी संदेश देणारी गाणी, नाटकं आणि इतर सर्जनशील उपक्रम राबवावेत, असं आवाहनही त्यांनी केले.

‘विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा’ ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ‘अमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अमली पदार्थमुक्त भारत’. या मोहिमेत मोठ्या संख्येने देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरूणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. अंमली पदार्थाचे व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात.

'अंमली पदार्थ-मुक्त भारता'साठी तुम्ही एखादे प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ-मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्यसमूह अशी हृदयस्पर्शी लघुनाटके लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशयनिर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा; कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपले योगदान देऊया. तसेच #NashaMuktYuva हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande