
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। बनावट मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्रेडिट कार्डची माहिती मिळवून सहायक शिक्षकाच्या कार्डवरून तब्बल २ लाख ३५ हजार ३२ रुपये परस्पर खर्च केल्याचा प्रकार शिरूर कासार येथे उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाळवंडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या जिजामाता चौक, शिरूर कासार येथे वास्तव्यास असलेले अशोक अर्जुन वाघमारे (३७) हे शासकीय निवासी शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक एकापाठोपाठ एक ओटीपी संदेश येऊ लागले. संशय आल्याने त्यांनी क्रेडिट कार्डच्या व्यवहारांची तपासणी केली असता त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन खरेदीचे चार व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये अनुक्रमे ८० हजार ४४५ रुपये, ५३ हजार ८५६ रुपये, ४० हजार ३८४ रुपये आणि ६० हजार ३४७ रुपये, अशा एकूण २ लाख ३५ हजार ३२ रुपयांची रक्कम क्रेडिट कार्डमधून वळती करण्यात आली.
दरम्यान, त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेल्या संशयास्पद ‘एम-परिवहन’ एपीके फाईलच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती व ॲक्सेस मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर कार्डचा गैरवापर करून ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अशोक वाघमारे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश रंगनाथ गाढवे करीत आहेत.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये, तसेच बँकिंग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis