
रायगड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कासमाळ येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाल्याने पेण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवत २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोप्रोली येथील संबंधित तरुणाने अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कासमाळ येथे नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. तक्रारीच्या आधारे संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, प्रकरणातील विविध बाबींची चौकशी केली जात आहे. पीडित मुलीच्या जबाबासह घटनेशी संबंधित पुरावे आणि परिस्थितीजन्य बाबींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करीत आहेत. तपासातून घटनेमागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)