
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट (हिं.स. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चायना मास्टर्स सुपर ७५० स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पण जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्याला स्पर्धेची सुरुवात खडतर करावी लागेल, कारण पहिल्याच फेरीत त्याचा सामना नव्याने विश्वविजेता बनलेल्या ॲलेक्स लॅनिएरशी होईल.
श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या ची यु-रेनशी होईल. माजी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला किदाम्बी श्रीकांतही या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. नुकतेच यूएस ओपन सुपर ३०० मध्ये उपविजेता ठरलेला श्रीकांत, ३२ च्या फेरीत चायनीज तैपेईच्या ची यु-रेनचा सामना करेल.
सात्विक आणि चिराग यांचीही कसोटी लागेल. पुरुष दुहेरीमध्ये, चौथे मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पहिल्या फेरीत चीनच्या हू के युआन आणि लिन शियांग यी यांचा सामना करतील. या चिनी जोडीने या हंगामात ऑर्लिन्स मास्टर्स जिंकले. सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी सिंगापूर ओपन जिंकले, परंतु जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ते तिसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. दरम्यान, हरिहरन आमसाकरुणन आणि एम.आर. अर्जुन यांचा सामना जपानचे आठवे मानांकित आणि २०२१ चे विश्वविजेते, ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्याशी होईल.
भारताच्या युवा खेळाडू उन्नती हुडा, तन्वी शर्मा आणि देविका सिहाग महिला एकेरीमध्ये आव्हान देतील. जुलै महिन्याच्या अखेरीस तैपेई ओपनमध्ये तिसरे स्थान पटकावणाऱ्या उन्नतीचा सामना चीनच्या पाचव्या मानांकित हान यूशी होईल. तैपेई ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या तन्वीचा सामना डेन्मार्कच्या अमाली शुल्झशी होईल. देविका सिहागचा सामना बल्गेरियाच्या कलोयान नलाबंतोवाशी होईल. २१ वर्षीय देविका थायलंड मास्टर्स सुपर ३०० चे विजेतेपद जिंकून चायना मास्टर्समध्ये पोहोचली आहे आणि तिचा आत्मविश्वास खूप उंचावलेला असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे