
रायगड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। दगड उत्खनन कंपनीशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रायगडमध्ये मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात CGSTच्या अतिरिक्त आयुक्तासह जीएसटी विभागातील अधीक्षक आणि एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विनय कुमार कांठेती, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, राकेश कुमार सिन्हा, अधीक्षक, जीएसटी, रायगड आणि खासगी व्यक्ती नरेंद्र राजपूत यांचा समावेश आहे. तक्रारदाराच्या दगड उत्खनन कंपनीशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुरुवातीला तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर चर्चेतून ही रक्कम ४० लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
ठरलेली लाचेची रक्कम खासगी व्यक्ती नरेंद्र राजपूत याच्यामार्फत स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने सापळा रचला. या कारवाईत नरेंद्र राजपूत याला ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सीबीआयने जीएसटी विभागातील अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती यांनाही ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर सीबीआयने आरोपींशी संबंधित विविध ठिकाणी झडती घेतली. या झडतीदरम्यान ४३ लाख रुपयांची रोकड आणि सुमारे ९० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
दरम्यान, लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. लाचेच्या रकमेचे आर्थिक व्यवहार, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच जप्त करण्यात आलेल्या रोकड आणि दागिन्यांच्या स्रोताचीही चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे रायगडमधील जीएसटी विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)