
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीला तब्बल आठ महिने उलटून गेले असतानाही शहरातील काही प्रभागांमध्ये मूलभूत नागरी सुविधांची अवस्था जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचा सूर उमटत आहे. काही भागांत अद्याप रस्ते व नाल्यांची सुविधा नाही, खेळाची मैदाने अस्वच्छ आहेत, काटेरी झुडपे व गवत वाढले आहे, तर झाडू आणि नाली सफाई कर्मचारी नियमितपणे येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने ‘नागरिकांचा वाली कोण?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील काही प्रभागांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक रस्ते अक्षरशः चाळणीसारखे झाले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अद्याप रस्तेच नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर नाल्यांची व्यवस्था नसलेल्या भागांमध्ये सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खेळाच्या मैदानांची अवस्थाही चिंताजनक आहे. मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे वाढल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होत नाही. शहरातील सार्वजनिक मैदानांची नियमित स्वच्छता करून ती नागरिकांसाठी वापरण्यायोग्य ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्वच्छतेच्या प्रश्नावरही नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही प्रभागांमध्ये झाडू कर्मचारी नियमित येत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा साचतो. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डासांची फवारणीही नियमित होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात डासांची संख्या वाढत असताना फवारणीची प्रभावी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पथदिव्यांच्या समस्येनेही नागरिक त्रस्त आहेत. काही ठिकाणी जुने पथदिवे बंद आहेत, तर काही भागांमध्ये आवश्यक असतानाही नवीन पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
याशिवाय काही प्रभागांमध्ये घंटागाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी नागरिकांना कचरा साठवून ठेवावा लागत असून परिसराच्या स्वच्छतेवर त्याचा परिणाम होत आहे. नागरिकांकडून वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी व निवेदने देण्यात येत असतानाही त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना वाढीस लागली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकांना विविध विकासकामांची आश्वासने देण्यात आली. मात्र, निवडणूक होऊन आठ महिने उलटूनही प्रत्यक्षात कोणती विकासकामे झाली, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. ‘आश्वासनांच्या पलीकडे विकासाचे गाजरच; प्रत्यक्ष काम मात्र कुठे?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन बैठकीपुरते मर्यादित न राहता स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील सर्व प्रभागांची पिंजून पाहणी करावी. प्रत्येक प्रभागातील समस्या प्रत्यक्ष पाहून नागरिकांशी संवाद साधावा, संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून कामांना कालमर्यादा द्यावी आणि प्रभागनिहाय विकास आराखडा जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. निवडणुकीनंतर आठ महिन्यांचा कालावधी उलटला; आता आश्वासनांचा नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांचा हिशेब द्या, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी