वीज कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेतल्यास थेट गुन्हा
सुट्टीच्या दिवशीही नागपूर-वर्ध्यात वसुली मोहिम नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.) : वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने राज्यभर कठोर पावले उचलली असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. शनिवार आणि रविवारच्य
वीज कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेतल्यास थेट गुन्हा


सुट्टीच्या दिवशीही नागपूर-वर्ध्यात वसुली मोहिम

नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.) : वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने राज्यभर कठोर पावले उचलली असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमध्येही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरले. थकबाकीदार ग्राहकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन वीजबिलांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा जागीच खंडित करण्यात आला.

या विशेष मोहिमेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी स्वतः सहभाग घेतला. त्यांनी मानेवाडा आणि खापरी परिसरात प्रत्यक्ष उपस्थित राहून वसुली मोहिमेची पाहणी केली. सोमवारी हिंगणघाट येथेही त्यांनी मोहिमेची धुरा सांभाळत प्रत्यक्ष कारवाईचा आढावा घेतला.या मोहिमेत नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्यासह परिमंडलातील कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, सहायक अभियंते तसेच तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

वीज कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेतल्यास कारवाई

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काही ग्राहक शेजाऱ्यांकडून वायर टाकून बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे मोहिमेदरम्यान निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांची महावितरणने गंभीर दखल घेतली असून, वीजपुरवठा अधिकृतरीत्या खंडित केल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेणे हा वीजचोरीचा प्रकार मानला जाऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात पोलीस तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.वीज वितरणाचे कायदेशीर अधिकार महावितरणकडे असल्याने कोणत्याही ग्राहकाने स्वतःच्या घरातील वीज जोडणी इतरांना देणे नियमबाह्य आहे. अशा प्रकारे वीज पुरवठा करणे हे वितरणाच्या अधिकारांचा भंग ठरू शकते.

एका ग्राहकाची थकबाकी दुसऱ्या कनेक्शनवरही

एखाद्या ग्राहकाच्या एकाच नावावर दोन स्वतंत्र वीज जोडण्या असल्यास आणि त्यापैकी एका जोडणीची थकबाकी भरली गेली नाही, तर नियमानुसार संबंधित थकबाकीची रक्कम ग्राहकाच्या दुसऱ्या सक्रिय जोडणीशी संबंधित केली जाऊ शकते. थकबाकीचा भरणा न झाल्यास दुसऱ्या जोडणीचा वीजपुरवठाही खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व देयके वेळेत भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

स्मार्ट मीटरमध्ये ‘ऑटो डिस्कनेक्ट’ सुविधा

आधुनिक वीजवितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी स्मार्ट मीटरमध्ये ‘ऑटो डिस्कनेक्ट’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विहित मुदतीत वीजबिलाचा भरणा न झाल्यास मानवी हस्तक्षेपाशिवाय या प्रणालीद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित होऊ शकतो.त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विहित मुदतीत वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे वीज घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल

“ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करून थकबाकीचा त्वरित भरणा करावा. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेण्यासारखे बेकायदेशीर प्रकार टाळावेत. तसेच स्मार्ट मीटरधारकांनी विहित मुदतीत वीजबिलांचा भरणा करून संभाव्य गैरसोय टाळावी,” असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande