
मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा क्रिस्टाने धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. जिजामाता उद्यानासमोर रस्ता ओलांडत असताना अंश गुप्ता या चिमुकल्याला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात अंश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर अंशच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक मेघा रावल या महिलेला अटक केली आहे. मेघा रावल या फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. अंशच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, मेघा रावल कार चालवत असताना फोनवर बोलत होत्या आणि निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्याचवेळी जिजामाता उद्यानासमोर रस्ता ओलांडणाऱ्या अंशला कारने धडक दिली.
अपघातानंतर अंशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कारचालक महिलेविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मेघा रावल यांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. दरम्यान, अंशचे वडील रवींद्र गुप्ता यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसल्याचे सांगत न्यायाची मागणी केली. “माझा एकुलता एक मुलगा या अपघातात हिरावला गेला. मला फक्त न्याय हवा आहे,” असा आक्रोश त्यांनी केला. मुलाच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी पोहोचलो, मात्र तेथे आल्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी मेघा रावल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule