
नागपूर-वर्ध्यातील 28,884 ग्राहकांचे अर्जतब्बल 16,932 ग्राहकांचे अंदाजपत्रक तयार
नागपूर/ 31 ऑगस्ट (हिं.स.) : सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प खर्चात स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ अर्थात ‘स्मार्ट’ योजनेला नागपूर परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील एकूण 28 हजार 884 ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत.
यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 18 हजार 7, तर वर्धा जिल्ह्यातील 10 हजार 877 ग्राहकांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांपैकी आतापर्यंत 16 हजार 932 ग्राहकांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यात नागपूर जिल्ह्यातील 11 हजार 229 आणि वर्धा जिल्ह्यातील 5 हजार 701 ग्राहकांचा समावेश आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या दुहेरी अनुदानामुळे ही योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. मात्र, योजनेमध्ये प्रथम डिमांड भरणाऱ्या ग्राहकाला प्राधान्य देण्यात येणार असून लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभ दिला जाणार आहे. निर्धारित संख्या पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार झालेले असले तरी अर्जदाराला शुल्क भरता येणार नाही. त्यामुळे पात्र ग्राहकांनी विलंब न करता आवश्यक शुल्काची रक्कम तातडीने भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
80 ते 95 टक्क्यांपर्यंत अनुदान
सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्राहकाचा सरासरी वीज वापर 100 युनिटपर्यंत असणे या योजनेसाठी बंधनकारक आहे. केंद्र व राज्य शासनाकडून 80 ते 95 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत असल्याने लाभार्थ्यांना अत्यंत नाममात्र खर्चात 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविता येणार आहे.योजनेअंतर्गत 30 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांसाठी केवळ 2 हजार 500 रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील ग्राहकांसाठी 5 हजार रुपये, तर इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांसाठी 10 हजार रुपये इतका नाममात्र लाभार्थी हिस्सा निश्चित करण्यात आला आहे.
वीज बिलात मोठी बचत होणार
‘स्मार्ट’ रूफटॉप सोलर योजनेमुळे घरगुती ग्राहकांना दरमहा 100 ते 120 युनिटपर्यंत वीज मोफत मिळण्यास मदत होणार आहे. घराच्या छतावर बसविण्यात येणाऱ्या सौर पॅनेलमधून दिवसा निर्माण होणारी वीज थेट घरगुती वापरासाठी उपलब्ध होणार असल्याने वीज बिलात मोठी बचत होऊन ग्राहकांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील ताण कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. अंदाजपत्रक तयार झालेल्या सर्व पात्र ग्राहकांनी प्रतीक्षा न करता आपला लाभार्थी हिस्सा तातडीने भरून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर