गणेशोत्सवात एलईडी व सौर ऊर्जेचा वापर करावा- महावितरण
नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.) : गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करताना सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन महावितरणतर्फे सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, प्रकाशमय, ऊर्जा बचत करण
गणेशोत्सवात एलईडी व सौर ऊर्जेचा वापर करावा- महावितरण


नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.) : गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करताना सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन महावितरणतर्फे सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, प्रकाशमय, ऊर्जा बचत करणारा आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महावितरणने विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपाची सजावट, रोषणाई आणि साऊंड सिस्टीमसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर केला जातो. त्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा अन्य विद्युत दुर्घटना टाळण्यासाठी केवळ प्रमाणित व कुशल वीज ठेकेदारांकडूनच वीज जोडणी आणि वायरिंगची कामे करून घ्यावीत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. घाईगडबडीत किंवा अननुभवी व्यक्तींकडून विद्युत कामे करून घेतल्यास जीवित तसेच मालमत्तेची हानी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या नियमांशी कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत वीज जोडणीसाठी ऑनलाइन सुविधा

गणेश मंडळांना अधिकृत तात्पुरती वीज जोडणी मिळविणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणने अर्ज प्रक्रिया सोपी केली आहे. मंडळांना आता कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची आवश्यकता नसून, महावितरणच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा ऑनलाइन संकेतस्थळाद्वारे अर्ज करता येणार आहे. या डिजिटल सुविधेमुळे अल्पावधीत तात्पुरती अधिकृत वीज जोडणी मिळविणे सुलभ झाले आहे.त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी अनधिकृत वीज जोडणीचा मार्ग टाळून केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.

वीज तारांपासून सुरक्षित अंतर आवश्यक

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही गणेश मंडळाने अनधिकृतपणे किंवा हूक टाकून विजेचा वापर करू नये, असा इशारा महावितरणने दिला आहे. मंडप उभारताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असून, वीजेच्या मुख्य तारा, रोहित्रे आणि विद्युत खांबांजवळ मंडप किंवा कमानी उभारू नयेत. तसेच विद्युत तारा आणि मंडपाची रोषणाई यामध्ये सुरक्षित अंतर राखावे, जेणेकरून संभाव्य विद्युत अपघात टाळता येतील.वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी तसेच आकर्षक रोषणाई करण्यासाठी पारंपरिक आणि अधिक वीज वापरणाऱ्या दिव्यांऐवजी ऊर्जा बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एलईडी दिव्यांमुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होण्यासोबतच मंडपाची रोषणाई अधिक आकर्षक आणि देखणी करता येते.

सौर ऊर्जेच्या वापरातून पर्यावरण संवर्धन

ऊर्जेची बचत करणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण कमी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शक्य तिथे गणेश मंडळांनी मंडप तसेच विविध उपक्रमांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करावा, असे महावितरणने म्हटले आहे.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. त्यामुळे ऊर्जा बचत, सौर ऊर्जा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश फलक, डिजिटल बॅनर्स तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांद्वारे भाविक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande