

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट (हिं.स.)। देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा जागतिक व्यापारिक घडामोडींचे केंद्र बनणार आहे. भारत मंडपम येथे 12 ऑगस्टपासून आयोजित होणारा भारतीय व्यापार महोत्सव देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि जागतिक व्यापारिक महत्त्वाकांक्षांचा एक मोठा मंच ठरणार आहे. भारतीय व्यापार महोत्सव 2026 चे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचीही उपस्थिती राहणार आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 15 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या भारतीय व्यापार महोत्सवाबाबत आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार आणि कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताच्या व्यापारिक, औद्योगिक आणि उद्योजकीय क्षमतांना जागतिक स्तरावर स्थापित करण्याच्या उद्देशाने भारतीय व्यापार महोत्सव 2026 (बीव्हीएम 2026) देशाच्या आर्थिक इतिहासात एक नवीन अध्याय लिहिणार आहे.
त्यांनी सांगितले की, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 12 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या महोत्सवाचे उद्घाटन करतील. त्यांच्यासोबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसेच कॅटच्या रणनीतिक सल्लागार स्मृती इराणी यांचीही उपस्थिती राहणार आहे. याशिवाय इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ प्रशासक, उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसेच विविध देशांतील व्यापारिक प्रतिनिधी मंडळेही या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
कॅटचे महामंत्री म्हणाले की, भारत मंडपम येथे आयोजित होणारा भारतीय व्यापार महोत्सव-2026 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “वोकल फॉर लोकल”, “लोकल टू ग्लोबल” आणि “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या महोत्सवात 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 700 पेक्षा जास्त प्रदर्शक आणि हजारो गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. त्यांनी सांगितले की, भारतीय व्यापार महोत्सव-2026 चा उद्देश भारतीय उत्पादक, व्यापारी, स्टार्टअप्स, एमएसएमई, महिला उद्योजक, कारागीर आणि सेवा क्षेत्रातील प्रतिभांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे, जिथून ते केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील बाजारपेठांपर्यंत आपली पोहोच निर्माण करू शकतील.
खंडेलवाल म्हणाले की, भारतीय व्यापार महोत्सव हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा “मेड इन इंडिया” व्यापारिक उपक्रम आहे, जो पूर्णपणे भारतीय उत्पादने, सेवा, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना समर्पित आहे. देशातील विविध राज्यांमधून 700 हून अधिक स्टॉल्स या महोत्सवात सहभागी होत आहेत, तर लाखो व्यापारिक अभ्यागत, संस्थात्मक खरेदीदार, उद्योगपती आणि उद्योजक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय 40 हून अधिक देशांमधून येणारी व्यापारिक प्रतिनिधी मंडळे आणि खरेदीदार याला एक वास्तविक जागतिक व्यावसायिक व्यासपीठाचे स्वरूप देतील.
त्यांनी सांगितले की, या महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादकांपासून निर्यातदारांपर्यंत, स्टार्टअप्सपासून मोठ्या उद्योगांपर्यंत, महिला उद्योजकांपासून ग्रामीण कारागिरांपर्यंत आणि पारंपरिक व्यवसायांपासून आधुनिक तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत सर्वांना एकाच मंचावर आणणे हे आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बायर-सेलर मीट, बी2बी आणि बी2जी नेटवर्किंग सत्रे, गुंतवणूक आणि निर्यात संवाद, स्टार्टअप शोकेस, तांत्रिक प्रदर्शने तसेच विशेष विषयांवरील पॅनल चर्चांमधून व्यापार विस्ताराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule