शेख हसीनांच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाशी संबंध नाही, भारताने स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली, 07 ऑगस्ट (हिं.स.) : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातून झालेल्या व्हर्च्युअल मीडिया कार्यक्रमानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यात नवा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाशी भारत सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे
रणधीर जयस्वाल, परराष्ट्र प्रवक्ते


नवी दिल्ली, 07 ऑगस्ट (हिं.स.) : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातून झालेल्या व्हर्च्युअल मीडिया कार्यक्रमानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यात नवा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाशी भारत सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, हा कार्यक्रम एका खासगी मीडिया संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात भारत सरकारची कोणतीही भूमिका नव्हती तसेच त्या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आलेल्या मतांना सरकारचे समर्थन नाही. बांग्लादेशच्या विद्यमान सरकारविरोधात करण्यात आलेली वक्तव्ये ही भारत सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये आल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या बोलताना शेख हसीना यांनी बांग्लादेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी यावर्षी डिसेंबरमध्ये बांग्लादेशात परतण्याची घोषणा केली. तुरुंगवास किंवा मृत्यूची भीती आपल्याला देशात परतण्यापासून रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच 2024 मधील आंदोलन हे प्रायोजित आणि सुनियोजित कट असल्याचा आरोप करत लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेख हसीना यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

डिसेंबरमध्ये बांग्लादेशात परतण्याची घोषणा.

2024 मधील आंदोलनाला सुनियोजित कट असल्याचा आरोप.

अवामी लीगवरील बंदी उठविण्याची मागणी.

राजकीय कैद्यांची सुटका, खोटे गुन्हे मागे घेणे आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची मागणी.

भारताला कठीण काळातील विश्वासू मित्र असल्याचे संबोधन.

त्यांचे पुत्र सजीव वाजेद यांनी बांग्लादेशला अपयशी राष्ट्र आणि दुसरा पाकिस्तान असल्याचा आरोप केला.

देशात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी निष्पक्ष न्यायप्रक्रियेची गरज असल्याचे मत.

दरम्यान, बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या भूमीचा वापर त्यांच्या देशाविरोधात राजकीय वक्तव्यांसाठी होऊ नये, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणीही पुन्हा केली. या पार्श्वभूमीवर भारताने कार्यक्रमाशी सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत आपली भूमिका ठामपणे मांडली.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande