
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) | गोरगरिबांना आमिष दाखवून त्यांच्या नावाने काढलेल्या अकाउंटचा सायबर फ्रॉडसाठी वापर करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना सायबर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. तिघेही अमरावती पोलिसांच्या कोठडीत आहेत. शेख अमीन शेख लतीफ, रवी विश्वनाथ गडलिंग (रा. राहुलनगर, बिच्छूटेकडी) व आकाश दीपक जयसिंघानी, असे अटक तिघांची नावे असल्याची माहिती सायबर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांनी दिली.
आठवड्यापूर्वीच शहर सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. बँक ऑफ इंडिया अमरावती येथील एका बँक खात्याचा देशातील विविध २० राज्यांतील सायबर फसवणुकीची रक्कम जमा करण्यात आली होती. सदर खात्याची केवायसी, दस्तऐवज, खात्याच्या व्यवहाराची माहिती, पडताळणी केल्यानंतर सदर खाते हे संशयित शेख अमीन शेख लतीफ यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले होते. तांत्रिक तपासात सायबर फसवणुकीतील प्राप्त झालेली रक्कम या खात्यात जमा करून ती पुढे विविध बँकखात्यांमध्ये व इतर माध्यमांतून हस्तांतरित करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात सदर खाते सायबर फसवणूक, ऑनलाइन गेमिंग व क्रिप्टोकरन्सी व्यवहारासाठी हे म्यूल अकाउंट म्हणून वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. सदर खात्यावर सुमारे ७१ लाखांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले.
अमरावती शहर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे सुरवातीला शेख अमीन शेख लतीफ याला अटक केली. त्याने पैशाच्या मोबदल्यात बँकखाते संशयित रवी विश्वनाथ गडलिंग (रा. राहुलनगर) याला उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. या तपासात रवी गडलिंग याने सदर खाते हे आकाश जयसिंघानी (पोद्दार बगीचा, रामनगर, वर्धा) याला वापरण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. नमूद तिघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्यांचे आंतरराज्यीय कनेक्शन तपासण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. या रॅकेटमध्ये अन्य कोणकोण सहभागी आहेत, त्याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.अटकेनंतर संशयित आकाश जयसिंघानीकडून चार सीमकार्ड, विविध बँक खात्यांच्या आर्थिक उलाढालीचे दस्तऐवज, काही चिठ्ठ्या व दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले.
नागरिकांनी कमिशन किंवा इतर कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले बँकखाते, एटीएम कार्ड, यूपीआय किंवा बँकेची गोपनीय माहिती इतरांना देऊ नये. कारण स्वत:चे खाते दुसऱ्याला उपलब्ध करून देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यांच्यापासून सावध राहावे. असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांनी केले.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी