इराणसमर्थित हूती बंडखोरांचा सौदी अरेबियावर हल्ला; 4 वर्षीय बालकासह 11 जण जखमी
रियाध, 07 ऑगस्ट (हिं.स.)।इराणसमर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील नजरान प्रांतावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकासह एकूण 11 नागरिक जखमी झाले आहेत.सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याची पुष्टी कर
इराणसमर्थित हूती बंडखोरांचा सौदी अरेबियावर हल्ला; 4 वर्षीय बालकासह 11 जण जखमी


रियाध, 07 ऑगस्ट (हिं.स.)।इराणसमर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील नजरान प्रांतावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकासह एकूण 11 नागरिक जखमी झाले आहेत.सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याची पुष्टी करत इशारा दिला आहे की, इराणसमर्थित हूती बंडखोर आणि इराकी सशस्त्र गट सौदी अरेबियातील नागरी ठिकाणे तसेच ऊर्जा पायाभूत सुविधांवर आणखी हल्ले करू शकतात.

लष्करी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मल्की यांनी हूती बंडखोरांवर आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उल्लंघन करत जाणूनबुजून नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लष्करी आघाडीच्या माहितीनुसार, गुरुवारी उशिरा रात्री हूती बंडखोरांनी नजरान प्रांतातील निवासी भागांवर अंधाधुंद क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात सात सौदी नागरिक, एक येमेनी, दोन इजिप्शियन आणि एक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले. जखमी झालेल्या सौदी नागरिकांमध्ये एका महिलेचा आणि चार वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे.

दरम्यान, लष्करी आघाडीच्या या आरोपांवर हूती बंडखोर किंवा इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे सौदी अरेबियासमोरील सुरक्षा आव्हाने अधिक गंभीर झाली आहेत.

एका वरिष्ठ सौदी अधिकाऱ्याने सांगितले की, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इतर मध्यपूर्वेतील देशांच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमनमधील हूती बंडखोर आणि इराकी सशस्त्र गट लवकरच संयुक्तपणे सौदी अरेबियावर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांच्या देखरेखीखाली होऊ शकणाऱ्या या संभाव्य हल्ल्यांमध्ये ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande