
नाशिक, 07 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील घरपट्टी व पाणी विभागाचे सहाय्यक अधीक्षक मारुती भिमाजी डोंगरे यांना अनधिकृत गाळ्यांची नियमित घरपट्टी आकारणी करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिक येथील ५१ वर्षीय तक्रारदार यांच्या इमारतीच्या पार्किंग जागेत तीन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. या गाळ्यांची घरपट्टी नियमित करण्यासाठी त्यांनी सिडको विभागीय कार्यालयात सहाय्यक अधीक्षक मारुती डोंगरे यांच्याकडे संपर्क साधला. डोंगरे यांनी सहकाऱ्यासह जागेची पाहणी करून गाळ्यांची नियमित घरपट्टी आकारणी करून देण्यासाठी ७० हजार रुपये तसेच यापूर्वीच्या कामाचे १० हजार रुपये, असे एकूण ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांनी ४ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने ८० हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करून ६० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. यानुसार नाशिक महानगरपालिका सिडको विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून ६० हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताच एसीबीच्या पथकाने मारुती डोंगरे यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. असून अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI