
- अंतर्गत सर्वेक्षण करणे ही काही नवीन गोष्ट नाही
- पक्षांतर्गत दोन मतप्रवाह, दत्तात्रय भरणेंनी मान्य केले प्रशांत किशोर राजकीय सल्लागार
मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.) - राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यामध्ये प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सल्लागार असल्याची चर्चा रंगात आली आहे. मात्र या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यानुसार प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही. त्यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही, पण जर त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मला ती नक्कीच माहीत असती, असंही ते यावेळी म्हणाले. तसेच, पक्षात दोन मतप्रवाह किंवा अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा या वावड्या असून त्या पूर्णपणे गैरवाजवी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सुनील तटकरे यांच्याविरोधात पक्षात नाराजी असल्याची देखील चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे आमचे नेते आहेत, कुठेही पक्षात त्यांच्याविरोधात नाराजी नाही. भाजपचीही कुठेही नाराजी नाही. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, असं यावेळी भरणे यांनी म्हटलं आहे.
तटकरे म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट ही औपचारिक होती. आमच्या पक्षात राज्य अथवा केंद्रीय नेतृत्वाला सध्या बाहेरील कोणत्याही राजकीय सल्लागाराची गरज भासलेली नाही. आम्ही जेव्हा 'एनडीए'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो पक्षातील सर्व नेत्यांनी मिळून आणि अत्यंत हिरीरीने घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर महायुतीचे विचार आणि कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नेत्याने अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्या सामूहिक मेहनतीचे फलित म्हणून आपल्याला यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षात कोणतेही दोन तट किंवा मतप्रवाह निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पक्षात आपल्याविषयी नाराजी असल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, काही माध्यमांमध्ये माझ्याबद्दल नाराजी असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. तुमचे सूत्र काय सांगते याच्याशी मला देणे घेणे नाही, कारण मला माझे 'गोत्र' नीट माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उभा करण्यासाठी ज्या मोजक्या नेत्यांनी संपूर्ण राज्य पालथे घातले, त्यामध्ये माझा समावेश आहे. मी गेली ४१ वर्षे सक्रिय राजकारणात आहे. १९८५ मध्ये काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्याच वर्षी मला विधानसभेचे तिकीटही मिळाले होते. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात मी सलग चार दशके पक्षाचे काम सांभाळत आहे. त्यामुळे हा प्रवास सहजासहजी झालेला नाही. राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची खडान् खडा माहिती मला आहे. अशा स्थितीत कोण काय बोलते किंवा काय तर्क लावते, याकडे लक्ष देण्याची सध्या वेळ नाही.
प्रशांत किशोर यांच्या कंपनीमार्फत राष्ट्रवादीकडून जिल्हावार सर्वेक्षण केले जात असल्याच्याही चर्चा आहेत. त्यावर बोलताना तटकरे म्हणाले की, पक्ष विस्तारासाठी किंवा जागांच्या चाचपणीसाठी अंतर्गत सर्वेक्षण करणे ही काही नवीन गोष्ट नाही. पूर्वी शरद पवार साहेबांना प्रत्येक जिल्ह्यातील १०-१२ प्रमुख कार्यकर्त्यांची नावे आणि तिथली राजकीय स्थिती तोंडपाठ असायची. अजितदादाही तशाच प्रकारे राज्यातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात. पक्ष मजबूत करण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात काहीही वावगे नाही. सध्याच्या बदलत्या काळात आम्ही सर्वजण त्याच आधुनिक आणि संघटित पद्धतीने काम करत आहोत, असे सांगत तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी