थायलंडमधील शाळेत विद्यार्थ्याकडून गोळीबार; दोघांचा मृत्यू, १५ जखमी
बँकॉक, 07 ऑगस्ट (हिं.स.)। थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मत्यू झाला असून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, किमान १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,
थायलंडमधील शाळेत गोळीबार; अनेकांच्या मृत्यूची भीती, किमान १५ जण जखमी


बँकॉक, 07 ऑगस्ट (हिं.स.)। थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मत्यू झाला असून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, किमान १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना थायलंडची राजधानी बँकॉकच्या बाहेरील नॉनथाबुरी जिल्ह्यातील देबसिरिन शाळेत घडली. एका विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात गोळीबार केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथके आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध माध्यमिक शाळेत गोळीबार झाल्याची माहिती पो टेक तुंग फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही. मात्र, वृत्तानुसार किमान दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आपत्कालीन पथकांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचत असताना विद्यार्थी शाळेबाहेर धावताना दिसत आहेत. या घटनेचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, सुरक्षायंत्रणांनी नागरिकांना या घटनेचे थेट प्रक्षेपण न करण्याचे आवाहन केले आहे.

थायलंडचे शिक्षणमंत्री प्रसर्ट चंतारारुआंगथोंग यांनी शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तातडीने मदत आणि आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, संवेदनशील माहिती सोशल मीडियावर शेअर करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचे आवाहन त्यांनी केले. एक्स वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “मी सध्या सरकारी कामानिमित्त उबोन रत्चाथानी प्रांतात असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व यंत्रणांना संबंधित अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती शक्य तितक्या लवकर नियंत्रणात आणणे, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच प्रभावित सर्वांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे तातडीने मूल्यांकन करून त्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी देशातील नागरिक आणि माध्यमांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो की, कृपया संवेदनशील छायाचित्रे, व्हिडिओ किंवा माहिती पुढे पाठवू नका किंवा प्रसारित करू नका. विशेषतः मृत, जखमी, विद्यार्थी किंवा या घटनेशी संबंधित व्यक्तींची ओळख उघड करणारे दृश्य अथवा अपुष्ट माहिती शेअर करू नका. अशा प्रकारच्या माहितीमुळे संबंधित कुटुंबीयांचे अधिकार, गोपनीयता आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.” यावेळी त्यांनी या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रतीही सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande