युद्ध लवकरच संपेल’; इराणबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान
वॉशिंग्टन, 07 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य करताना सांगितले की, इराण विरोधात सुरू करण्यात आलेली मोहीम अत्यंत महत्त्वाची होती. कारण, इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत, हे सुनिश्चित करणे हा या मोहि
युद्ध लवकरच संपेल’; इराणबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान


वॉशिंग्टन, 07 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य करताना सांगितले की, इराण विरोधात सुरू करण्यात आलेली मोहीम अत्यंत महत्त्वाची होती. कारण, इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत, हे सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या सुरू असलेले युद्ध आता फार काळ चालणार नाही आणि ते लवकरच संपेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

ट्रम्प म्हणाले, “इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाविरोधात आम्ही अत्यंत महत्त्वाची मोहीम सुरू केली. या मोहिमेचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे इराण अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही, याची खात्री करणे. मला वाटते हे युद्ध लवकरच संपेल. आता ते फार काळ चालेल, असे मला वाटत नाही.” मात्र, युद्ध संपवण्यासाठी पुढे कोणती रणनीती अवलंबली जाणार आहे, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच इराण आणि ओमान यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.

सध्या इराण आणि ओमान यांच्यात ओमानच्या सामुद्रधुनीसह विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या महत्त्वाच्या सागरी मार्गावर कोणताही अतिरिक्त तणाव निर्माण होऊ नये, हा या चर्चेचा उद्देश आहे.

अलीकडे काही माध्यमांमध्ये अमेरिकन सैन्याकडे इराणमधील युद्ध तसेच इतर संभाव्य लष्करी मोहिमांसाठी आवश्यक क्षेपणास्त्रे आणि दारूगोळ्याची कमतरता असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या वृत्तांचे खंडन करत ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या लष्करी कारवाईसाठी आवश्यक शस्त्रसाठ्याची कमतरता नसल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, पॅट्रियट, टॉमहॉक, साइडवाइंडर क्षेपणास्त्रे तसेच सर्वसाधारण दारूगोळ्याची मागणी वाढली असली तरी या सर्व शस्त्रांचे उत्पादन वेगाने वाढवले जात आहे. या उत्पादनासाठी लागणारा खर्च अमेरिकन काँग्रेसकडून मंजूर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्य आवश्यक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी पूर्णपणे सज्ज आहे आणि शस्त्रटंचाईबाबत समोर येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा त्यांनी दावा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande