
वॉशिंग्टन , 07 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माच्या आधारे मिळणाऱ्या अमेरिकन नागरिकत्वाच्या कक्षेला मर्यादा घालण्यासाठी आणि ‘बर्थ टुरिझम’ला आळा घालण्यासाठी दोन नवीन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे.
या आदेशानुसार, ‘बर्थ टुरिझम’च्या माध्यमातून जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व दिले जाणार नाही. म्हणजेच, केवळ बाळाला जन्म देण्यासाठी पर्यटक (टुरिस्ट) व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या महिलांच्या मुलांना जन्मतःच अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. यापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा तो आदेश फेटाळून लावला होता, ज्यामध्ये अमेरिकेत जन्मलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना नागरिकत्व नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे की, नव्याने जारी करण्यात आलेले हे दोन्ही आदेश पूर्णपणे संविधानसुसंगत आहेत.
ट्रम्प यांनी स्थलांतर (इमिग्रेशन) संदर्भातील दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी एक आदेश ‘बर्थ टुरिझम’ संदर्भात असून, अमेरिकेत येऊन बाळाला जन्म देण्याचा उद्देश असलेल्या परदेशी पर्यटकांवर व्हिसा निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. दुसऱ्या आदेशानुसार, ज्या मुलांच्या पालकांचा दहशतवादाशी संबंध आहे, त्या मुलांनाही अमेरिकन नागरिकत्व दिले जाणार नाही. तसेच, परदेशी सरकारांचे राजनयिक, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही.
जून महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जन्माच्या आधारे मिळणारे नागरिकत्व (बर्थराइट सिटिझनशिप) कायम ठेवत ट्रम्प यांचा आधीचा आदेश फेटाळून लावला होता. त्या आदेशाद्वारे अमेरिकेत बेकायदेशीर किंवा तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींच्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, अमेरिकेत बेकायदेशीर किंवा तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या व्यक्तींची मुले अमेरिकेत जन्माला आल्यास त्यांना जन्मतः अमेरिकन नागरिकत्व मिळण्याचा घटनात्मक अधिकार आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती. “या निर्णयामुळे आमच्या देशाचे नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता आम्ही वेगळ्या मार्गाने सोडवू,” असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode