
वॉशिंग्टन , 07 ऑगस्ट (हिं.स.)।इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ला अमेरिकेतील न्यायालयात मोठा फटका बसला आहे. न्यू मेक्सिको येथील न्यायालयाने मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणे आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मेटावर 567 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5,390 कोटी रुपये) इतका मोठा दंड ठोठावला आहे.
न्यायमूर्ती ब्रायन बिडचेड यांनी आपल्या निर्णयात नमूद केले की, कंपनीने मुलांच्या सुरक्षेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. न्यायालयाने स्पष्ट केले की, दंडाच्या रकमेपैकी बहुतांश निधी तरुणांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित रक्कम पुढील पाच वर्षांत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मानसिक आरोग्य तपासणी सेवा (स्क्रीनिंग) आणि इतर संबंधित उपक्रमांवर खर्च केली जाईल. अमेरिकेतील एखाद्या राज्याने एखाद्या मोठ्या तंत्रज्ञान कंपनीविरोधात अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. कंपनीची जबाबदारी निश्चित करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, 567 दशलक्ष डॉलर्सपैकी 420 दशलक्ष डॉलर्स तरुणांच्या मानसिक आरोग्य उपचारांसाठी खर्च करण्यात येणार आहेत. हा दंड यापूर्वी याच प्रकरणाच्या पहिल्या टप्प्यात मेटावर ठोठावण्यात आलेल्या 375 दशलक्ष डॉलर्सच्या दंडाव्यतिरिक्त आहे. त्यामुळे मेटावरील एकूण दंडाची रक्कम आता 942 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली आहे.
पहिल्या टप्प्यात ज्युरीने असा निष्कर्ष काढला होता की, मेटाने जाणीवपूर्वक मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवली आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित माहिती लपवून ठेवली. त्यासाठी कंपनीवर 375 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे मेटामध्ये व्यापक बदल करण्याची मागणी केली. यामध्ये मुलांना व्यसनाधीन बनवणाऱ्या (अॅडिक्टिव्ह) फीचर्सवर नियंत्रण, वय पडताळणी प्रणाली अधिक प्रभावी करणे, डिफॉल्ट गोपनीयता (प्रायव्हसी) सेटिंग्ज अधिक कडक करणे आणि कडक देखरेखीच्या माध्यमातून मुलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode