
रत्नागिरी, 8 ऑगस्ट (हिं.स.) । तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेकडून रत्नागिरीत “आदित्य युवा हेल्पलाइन” सुरू करण्यात आली आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
शिवसेना तालुका समन्वयक शेखर घोसाळे आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ही सेवा रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या ५ तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाइनच्या माध्यमातून युवकांना विविध समस्यांसाठी मदत मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या समस्या, शालेय, महाविद्यालयीन आणि पायाभूत सुविधांच्या अडचणी, उच्च शिक्षणासाठी पर्याय, एसटी बस आणि परिवहन संबंधित इतर समस्या, दाखले, प्रमाणपत्रे मिळवण्यात होणारी दिरंगाई आणि प्रशासकीय अडथळे, डोंगराळ भागात इंटरनेट आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या, चिपळूणमधील पूर परिस्थितीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत, आरोग्य सुविधांमधील कमतरता इत्यादींसाठी मदत केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी युवा सेनेतर्फे प्रत्येक तालुक्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. ते असे - रत्नागिरी : संदेश नारगुडे – 7020127980, ओंकार करेकर – 7378707909, आशिष चव्हाण – 9175353635, चिपळूण : प्रितम वंजारे – 7038840385, पार्थ जागुष्टे – 7447774442, संगमेश्वर : अमर गवाणकर – 9421136707, लांजा : अभिजित राजेशिर्के – 8888259725, राजापूर: संतोष हातणकर – 7620676731, सुभाष नवाळे – 9420843958. याशिवाय जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांच्याशी 9112056156 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
या उपक्रमामुळे युवकांच्या समस्या तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यास मदत होणार असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी