
नांदेड, ८ ऑगस्ट (हिं.स.) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजबांधवांना उत्साह, एकजूट आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेतून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून आदिवासी समाजाची अस्मिता, हक्क, परंपरा आणि सर्वांगीण विकासाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस असल्याचे आमदार केराम यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील युवकांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बदलत्या काळानुसार शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून युवकांनी प्रगती साधावी, तसेच आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करावे, असे त्यांनी नमूद केले.
किनवट विधानसभा क्षेत्रातील सर्व आदिवासी बांधवांनी पारंपरिक संस्कृतीचे जतन करत एकजुटीचा संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार केराम यांनी केले.
सामाजिक ऐक्य, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि विकासाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis